बावरा मन राह ताके तरसे रे...
नैना भी मल्हार बनके बरसे रे...
आज सकाळी सकाळी हे गाणे ऐकले अन मी विचार करायला लागलो... पावसाळा असाच असतो... उगाच विचार करायला लावतो. एक नवीन जाणीव देऊन जातो, किंवा कदाचित अशी नवी जाणीव आहे... याची जाणीव देऊन जातो! स्वतःलाच स्वतःमध्ये कुठेतरी हरवायला लावतो!
पूर्वी शाळेतून कॉलेज मधून येताना, इकडे तिकडे जाताना येताना भिजायला व्हायचं... तेव्हा भिजू नये असा प्रयत्न असायचा... आता आतून भिजावस वाटत, पण खिशात मोबाईल असतो, पाठीवर laptop असतो, पैसे, कागदपत्र असतात, मुख्य म्हणजे एकदम कोरडे ठक्क मन असते... जे पटकन ओले होऊ देत नाही... जास्तीत जास्त हात बाहेर काढून भिजवू पाहतो, पण चिंब ओली अवस्था आताशा साधता येत नाही! एकतर फार पाऊस आहे, कुठे कशाला बाहेर जायचं असं विचार असतो, किंवा जायचाच असेल तर चार चाकी घेऊन जाऊ... चारचाकी मध्ये सोय आहे, पण गम्मत नाही! पावसापासून वाचण्याची सोय आहे, पण वारा पावसाचे झोक येऊन गाडी इकडे तिकडे वाहण्याची गम्मत नाही...
पहिला पाऊस आला, आणि कबीर खिडकीत जाऊन उभा राहिला... चेहऱ्यावर अपरिमित आनंद... अंगावर पावसाचे तुषार होते, हात बाहेर काढून "खूप पाऊस पडतोय, अरे बाबा बघ किती पाऊस पडतोय..." अन मी? खिडकी बंद करायला हवी, नाहीतर सोफा ओला होईल, आता रेनकोट शोधायला हवा, चपला चालणार आहेत का कि अजून खर्च... असल्या विचारात...
हल्ली पाऊस बाहेर पडतो, मनात पडत नाही... जमीन ओली होते... मन ओले होत नाही... मग कधी कधी असे विचार मनात येतात, न हे सगळं अचानक अनोळखी वाटायला लागत... जसे जसे मोठे झालो तसे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप छोट्या वाटायला लागतात... कदाचित आत्तापर्यंत किमान ३३ वेळा तरी पहिला पाऊस पाहिलेला असल्यामुळे असेल, पण त्यातली हुरहूर मनापर्यंत पोचत नाही... पोर इतकं का आनंद्लय समजत नाही!
पाण्याने भरलेलं तळ, त्यात उडी न मारता चुकवलं, की समजावं बालपण संपलं!!
पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा.
कधी उधाणता, तर केव्हा, थेंबांच्या संथ लयींचा!
No comments:
Post a Comment