Friday, June 24, 2016

आजी- आईची आई

आईची आई, म्हणजे दोनदा आई. किती गोडवा असेल मग त्यात? म्हणायला ठीक आहे, पण दोनदा आई म्हणजे जरा धोकादायक आहे. असो!!

आजी... माझ्या ह्या अजिबारोबारच्या आठवणी एकट्या तिच्याबरोबरच्या नाहीत. आजी आजोबा दोघांच्या आहेत. त्यांचे डोंबिवली चे घर, स्वच्छ आवरलेले आणि सतत स्वच्छ होत असलेले. होय, आजीला स्वच्छतेची आवड होती. भयंकर! आवड म्हणणे थोडे कमी आहे, आजीला स्वच्छतेचे वेड होते. तिला मी गमतीने म्हणायचो सुद्धा, की "आजी, धुणे वळत घालून झाले. आता ती वळत घालायची काठी धुवायची राहिली आहे फक्त..."

मला आजीच्या हातची लसुणाची चटणी फार आवडायची... गेलो कि माझी फर्माईश असायचीच... अन आजोबांचे केक, चोकलेटस आणि आईसक्रीम... जेली, जाम आणि बिस्किटे सुद्धा... आवडायचे नाहीत ते आजीचे डांगर... डांगर नावाचा भयंकर पदार्थ करायची ती... आणि भाजणी... पण आवडते जेवढे आग्रहाने खायला मिळायचे तेवढेच नावडते सुद्धा. 

आजी रसिक होती. tv आवडायचा तिला. cooking चे कार्यक्रम अगदी आवडीने बघायची. तिची खरी मजा यायची भारत पाकिस्तान क्रिकेट मेच बघताना... तिला क्रिकेट अतिशय प्रिय होते... आणि शेवटची ओव्हर सुरु झाली, आणि आपण हरत असलो कि ती बिचारी आत जाऊन बसायची... आणि मी प्रत्येक बॉल ची Live commentary तिला पळत जाऊन सांगायचो... पु.लं.नी सुद्धा असा एक प्रसंग लिहिला आहे त्यांच्या एका पुस्तकात, म्हणून मी इतका वेड लागल्यासारखा वाचायचो बहुतेक त्यांची पुस्तकं... मग मेच जिंकली की आम्ही दोघे वेड्यासारखे नाचत असू...

१९९१ च्या मे महिन्यात राजीव गांधींचा खून झाला तेव्हा मी डोंबिवलीला होतो... सकाळी उठलो तेव्हा आजी बिचारी एकदम सचिंत tv समोर बसलेली होती... मी उठल्यावर मला तिने लगेच सांगितलं काय झालाय ते... मला फार काही वाटलं नाही, पण तिला खूपच धक्का बसला होता... मी फारच लहान होतो ते कळायला... पण तरीही तिने मला सांगितला होते ते... 

आजीच्या घरून गोष्टी भरून पुण्याला घेऊन येणे हा माझा आवडता खेळ होता... मामा त्याला पोत म्हणायचा... मी मे महिन्याच्या सुट्टीला घरी आलो की लगेच, "चला... पोते तयार आहे, भरायला घ्या... " अशी घोषणा व्हायचीच! 

आजीने माझ्यासाठी अनेक कामे काढून ठेवलेली असायची, आवरा-आवरी, वस्तू दुरुस्त करणे (होय, तेव्हाही मला लाकडी किंवा कुठल्याही वस्तू दुरुस्त करायला फार आवडायच्या, आणि मी आजीला पुरेपूर मदत करायचो असल्या कामात!), आजोबांनी गावभर फिरून गोळा करून आणलेल्या वस्तूंची योग्य ('योग्य' ह्या शब्दाच्या व्याख्या आजी आजोबांच्या वेगवेगळ्या होत्या. आजीच्या मते 'फेकून देणे' तर आजोबा त्याचाच अर्थ 'कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरणे' असा घेत असत. मी? मी त्यावेळी जो जास्त पावरबाज असेल त्याच्या बाजूने झुकत असे...) विल्हेवाट लावणे ह्यासारखी कामे ठेवलेली असायची. मग मी त्यातून आणखी उपकामे शोधून काढायचो... घोळ घालायचो... तेव्हाही!

आजोबांना गोष्टी गोळा करण्याचा षोक होता... त्यांच्या कपाटात आणि बेड च्या खाली दोन विशेष खण होते, ते फक्त अश्या गोष्टींनी भरलेले असायचे. त्यात बटने, बोबीन, रिले, सुया, बाटल्यांची झाकणे, हत्यारे, अगदी लहान आकारापासून एकदम मोठ्या पर्यंत सर्व प्रकारच्या हेक्सो ब्लेड्स, बागकामाचे अनेकानेक साहित्य असे खुप काय काय असायचे. हा माझ्या सर्वात आकर्षणाचा भाग होता. ह्या गोष्टी काढायच्या, sort करायच्या, आजी बघत असेल तर फेकून द्यायच्या आणि सर्वात मजेशीर म्हणजे त्यातून नवीन काहीतरी तयार करायचे. आजोबांना हे वेड का होते माहित नाही, त्यांच्या पश्चात ह्या सर्व गोष्टी फेकुनच दिल्या गेल्या. त्यांच्या दुसर्या घरी त्यांनी खूप हत्यारे माझ्यासाठी जपून ठेवली होत. मला देणार होते ते... पण काही करण्याआधीच तिथे चोरी झाली. मला फार फार वाईट वाटलेला एक प्रसंग...

आजी आजोबांना घाबरत असावी. कधी म्हणायची नाही, पण एकूण वागणुकीतून जाणवायचे... त्यांच्या नावाने बडबड करायची, पण त्यांनी कितीही वेळा चहा मागितला (आजोबांना चहाचे वेड होते, दिवसातून १५-२० अर्धा अर्धा कप चहा व्हायचाच... सुरवातीला स्वतः करून घ्यायचे, नंतर नंतर कुणीतरी करून द्यायचं) तरी ती न कुरकुरता, न कंटाळता द्यायची!

आजोबा गेल्यानंतर आजीने हाय खाल्ली. त्यातून ती बिचारी सावरुच शकली नाही. आयुष्याच्या शेवटच्या घडीला तर तिला वृद्धाश्रम व रुग्णालयात घालवावा लागला... सगळे करते सावरते सोबत असताना, मुल-मुली-नातवंड, म्हातारीला एका लहानश्या ५X३ च्या अंथरुणावर खिळून राहावं लागलं. जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा म्हणायची, "मी ह्यातून बरी झाले न, की तुझ्या घरी येणार आहे रे. मला घेऊन जा घरी. फार नको मला, एक कॉट टाकून दे, तिथेच राहीन." पण आपण वरपांगी जेवढे चांगले असतो तेवढेच कोत्या मनाचे असतो... तिला हो म्हणून तिथून निघून येताना नेहमी त्रागा व्हायचा मला, पण मी काहीही केले नाही...

अखेर एक दिवस तिथून फोन आला... म्हातारी आज सकाळी ५ वाजता गेली. रीतसर सोपस्कार झाले. तिला अश्या कर्दमलेल्या अवस्थेत पाहवत नव्हत... "सुटली", "बाकीचे सुटले" अश्यासारखे उद्गार निघाले. कोण नक्की सुटले माहित नाही. त्रास नक्की कुणाला झाला, किती आणि कुणामुळे झाला ह्या विचारात न शिरलेलेच बरे. पण तिचे जाणे माझ्यासाठी माझ्याच षंढ प्रतिमेचे प्रतिबिंब होते, हे मात्र नक्की!

No comments:

Post a Comment

Featured Post

First day at school

First day at school Yes, first day at school. I do not remember my first day at school... frankly I do, but may be I don't want to...