एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर आपल्याला अचानक तिची उणीव भासायला लागते. आजीशी असलेले माझे नाते जरासे abstract होते. मी तिला रोज भेटत नव्हतो. ना फार गप्पा मारायचो फोन करून. आत्ता शेवटी शेवटी ती मला रागवायची पण, ‘अरे, मी आहे अजून... तू भेटायला नाही तर नाही, पण फोन करावा एखादा...’ माझ्यात फारसा बदल झाला नाही, पण आता चुटपूट लागून राहिलीये.
पण लहानपणी, जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा आणि घर सोडल्यानंतरची काही वर्ष, आजीशी खेळायचो मी खूप. भातुकली, घर घर, ऑफिस ऑफिस, ह्या सगळ्या खेळातली माझी सवंगडी होती आजी! घरी मी दमून आल्यावर मला छोट्या कपातून चहा देणारी, माझी विचारपूस करणारी, मला दाणे गुळाचा नाश्ता खाऊ घालणारी आजी... खेळताना खेळात एकरूप होऊन, ‘हे काय लहान मुलाचं आहे, कसही केलं तरी काय’ असा attitude न ठेवता एकदम seriously खेळण्याची वृत्ती मला आजीमुळे मिळाली असावी. आता विचार केला तर अशा अनेक गोष्टी मला आजीमुळे मिळाल्या असतील, अनेक अशा असतील ज्यांना मी अजूनही अनभिज्ञ असेन.
मृत्यू अटळ आहे आणि प्रत्येक जन्माला आलेल्याला तो कधी न कधी येणारच आहे. स्वतःच्या आयुष्याची ८३ वर्ष आजीने पाहिली... आणि माझे संपूर्ण आयुष्य... आमच्या नात्यात सगळे छान छान गोड गोडच होते असे नाही, अनेक बरे वाईट प्रसंग आले मधे, नात्याच्या अस्तरला अनेक सुरकुत्या पडल्या, अनेक ठिकाणी ते विरलेही... पण माझ्या मनातल्या आजीच्या कल्पनेशी ही आजी मिळती-जुळती राहिली. लहान लहान प्रसंगातून भावत राहिली... तिचं आजीपण दाखवत राहिली... ती गेली त्या क्षणी आणि आता तिच्या आठवणीनेही मी टिपं गळली नसतील कदाचित, पण मनात आत खोलवर एक अंधारा कोपरा आहे जिथे मला शांतपणे जाऊन बसावसं वाटतंय... काहीही न बोलता!
Rest in peace आजी!
No comments:
Post a Comment